सावंगी (देवळी) येथे उत्साहात प्रवेशोत्सव; बैलबंडी प्रभातफेरीने नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

हिंगणा | ता. मोहन नागेश्‍वर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सावंगी (देवळी) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभानिमित्त प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. पहिली इयत्तेत प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे गावातून बैलबंडीतून प्रभातफेरी काढून जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांच्या पावलांचे ठसे घेण्यात आले. त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, पाठ्यपुस्तके आणि गणवेशाचे वितरण करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला नियमित शाळेत पाठवून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सभापती तथा भाजप जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बोढारे, सरपंच मयुरी सोनवणे, उपसरपंच संगीता वडमे, मुख्याध्यापिका पचारे, शिक्षक जीवन राठोर, संगीता जांभुळे, मंगला गेडाम, शुभांगी बोढारे, जयश्री काकडे, धनराज पवार, प्रेमदास येनूरकर, संदीप धारणे, लक्ष्मण जांभुळे यांच्यासह शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!